कथा देवदूत

चंद्रकांत काशीनाथ निकाडे
भ्रमणध्वनी- ९९२२३१४५६४
दि. २२ मार्च, २०२६

मा. संपादकसोा,
मुक्त संवाद, इंदौर.

विषय – मुक्त संवाद, इंदौर. साठी बालकथा स्वीकारणेबाबत...
महोदय,
सोबत मी माझी देवदूत ही कथा अप्रकाशीत कथा किशोरसाठी पाठवत आहे. स्वीकार व्हावा ही विनंती.

आपला विश्वासू

चंद्रकांत काशीनाथ निकाडे
पोहाळे तर्फ आळते
ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर
पिन - 416229
भ्रमणध्वनी- ९९२२३१४५६४
दि. २२ मार्च, २०२६





देवदूत
चंद्रकांत निकाडे
  ९९२२३१४५६४
डोंगरगावच्य मराठी शाळेत आणि गावातही वरचेवर चोऱ्या होत होत्या. गावकऱ्यांना वाटायचं शिक्षक मुलांच्याकडे नीट लक्ष देत नाहीत, त्यांना चांगलं वळण लावत नाहीत यामुळेच शाळेतील एखादा मुलगा चोऱ्या करत असावा. तसा पुरावाही सापडला होता. त्यामुळे अगोदरच दोन शिक्षक असणाऱ्या शाळेतून शिक्षक बदली करून घेत असत.   
त्याच शाळेत हजर व्हायला आलेल्या देवबाई अंगणाच्या कडेला बसून डोंगरांचे सुंदर दृश्य पाहत होत्या. त्यांच्याजवळ उभी राहिलेली घरमालकीण गोदाकाकू म्हणाली, ‘‘बाळा, तू शहरातून आलीस ना? तुला आमचं गाव कसं वाटलं?’’
‘‘गाव खूप सुंदर आहे, पण मला हे ऐकून काळजी वाटली की इथे शाळेत व गावातही खूपदा चोऱ्या  होतात. शाळेतील एक मुलगा चोऱ्या करतो म्हणे.’’
‘‘हो गं लेकी, तो जीवन गावभर चोऱ्या करून सगळ्यांना त्रास देतो... तूही तुझे कोणतेही सामान बाहेर ठेवू नकोस. तो डोळ्यांच्या पापण्या लवतात न लवतात इतक्या झटक्यात काहीही चोरून नेतो.’’
देवबाई घाबरत म्हणाल्या, ‘‘मग तो चोर आहे हे माहीत असून तुम्ही त्याला पकडून पोलिसांकडे का देत नाही?’’
गोदाकाकू हसून म्हणाली, ‘‘तुला अजून काही माहीत नाही गं! जीवन अजून फक्त बारा-तेरा वर्षांचा आहे, पण मोठ्यांसारखा त्रास देतो. आधी खूप छान होता, पण अचानक बदनाम झाला.’’
गोदाकाकूच्या शब्दांनी देवबाईंना वाईट वाटले व त्यांनी विचारले, ‘‘जीवनचं घर कुठे आहे काकू? मला तिथे जायचं आहे.’’
गोदाकाकूने बोट दाखवत सांगितले, ‘‘ते लाल रंगाच्या कौलांनी झाकलेलं घराचं छप्पर दिसतं ना, तेच त्याचं घर. त्याचे वडील भीमा आणि आई रमा अंगणातच बसलेत. मुलाच्या वाईट कृत्यांनी ते कंटाळलेत. बहुतेक तू त्याला समजावायला जाणार असशील; पण त्याचा काही उपयोग नाही.’’
‘‘नाही, मी त्याला नक्की समजावेन,’’ असे मोठ्या आत्मविश्वासानेम्हणून देवबाई सायंकाळी  जीवनच्या घराकडे निघाल्या.
गोदाकाकूला मात्र त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही.
देवबाई जीवनच्या घरी पोहोचली. भीमाने त्यांना ओसरीवर बसायला सांगितले आणि अत्यंत वाईट वाटून म्हणाला, ‘‘तुम्ही नव्या बाई ना? जीवनने तर तुमच्यासारख्या नवक्या माणसालाही सोडलं नाही. काय चोरलं त्यानं?’’
देवबाई उत्तर द्यायच्या आतच जीवन आला आणि ओसरीवर बसून म्हणाला, ‘‘कोणीही माझ्यावर विश्वास ठेवत नाही की मी चोर नाही. मारा मला जितकं हवं तितकं. रेखाबाई म्हणायच्या की स्वर्गातून एक देवदूत येतो, त्याला सगळं खरंखपरं माहीत असतं. मी नेहमी त्या देवदूताला बोलावतो, पण तो कधी येत नाही. एकदा तो आला की, ज्यांनी मला चोर म्हणून मारलं त्यांना शिक्षा करेल.’’
जीवनची निरागस व करुण वाक्ये ऐकून देवबाईच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांनी हात पसरून म्हटले, ‘‘ये बाळा, मीच तो देवदूत आहे. तुला मारायला नाही तर मदत करायला आलेय.’’
जीवन धावतच देवबाईकडे आला व रडत म्हणाला, ‘‘हे देवदूता, मला तुझ्यासोबत घेऊन चल. मला इथे राहायचं नाही. सगळे मला चोर म्हणून मारतात.’’
देवबाईंनी त्याला धीर देत सांगितले, ‘‘कोणी तुला ओळखलं नाही, पण मी सगळ्यांना सांगीन तू कोण आहेस. उद्या आपण सोबत शाळेत जाऊ या, चालेल?’’ 
जीवनने आनंदाने मान्य केले. देवबाई निघणार होती तेव्हा जीवन म्हणाला, ‘‘आपण उद्या देवदूतांच्या दुनियेत जाणार ना?’’
देवबाईने त्याला धीर देत होकार दिला आणि जीवन आनंदाने घरात गेला. देवबाई आपल्या खोलीत परतत्या. जीवनचे आईवडील मात्र त्यांच्यातील संवाद समजून घेऊ शकले नाहीत.
उद्या शाळेत देवदूत येणार आहे व आपण देवदुताबरोबरच शाळेत येणार असल्याची खबर जीवनने रातोरात आपल्या शाळेतील सर्व मुलांपर्यंत पोहचवली. देवबाईंनी रात्री जीवनबद्दल असलेल्या सर्व तक्रारी गोदाकाकूंकडून समजून घेतल्या. आपण शाळेत हजर व्हायला उद्या येत आहोत असे फोनवरून सांगितले. नव्या शाळेतील पहिल्या दिवशीच करावयाच्या कामाची योजना आखत झोपी गेल्या.
दुसऱ्या दिवशी, जेव्हा देवबाई व जीवन शाळेत पोहोचले, तेव्हा देवदूत जीवनला काय शिक्षा देतो हे पाहायला गावभरचे लोक आधीच मैदानात जमले होते.
देवबाईंनी प्रार्थनेच्या अगोदरच मैदानाच्या मधोमध खुर्ची ठेवून जीवनला त्यावर उभं केलं आणि सर्व मुलांना उद्देशून म्हणाल्या, ‘‘प्रिय विद्यार्थ्यांनो! मी देवदूत आहे. आत्तापर्यंत तुम्ही केलेले सगळे चांगले-वाईट कृत्य मी वरून पाहिलं आहे. जर तुम्ही खरं सांगितलंत तर मी काही करणार नाही. आता सांगा खरं खरं, प्रवीणचा पेन जीवनच्या पिशवीत कोणी ठेवला?’’
प्रवीण घाबरत म्हणाला, ‘‘देवदूतबाई, जीवन नेहमी मला कॅरममध्ये हरवत असे, म्हणून मी रागावलेलो होतो. शिक्षकांनी त्याला शिक्षा द्यावी म्हणून मीच माझा पेन दुपारच्या सुटीत त्याच्या पिशवीत ठेवला. नंतर धुरूसरांनी सर्वांचे दप्तर तपासले तेव्हा तो पेन जीवनच्या पिशवीत पाहून त्याला चोर सापडला म्हणत मारलं, तेव्हा सगळ्यांनी त्याला चोर समजलं.’’
देवबाईंना प्रवीणला पुन्हा अशी चूक न करण्याबद्दल समज दिली आणि सर्वांना उद्देशून विचारलं, ‘‘शेजाऱ्यांची भांडी कोणी चोरली होती?’’
आठ-दहा वयातील चार-पाच मुले एकदम म्हणाली, ‘‘देवदूतबाई, तो पाटलांचा राजू दुकानदार भांड्यांच्या बदल्यात आम्हाला मिठाई, बिस्किटं देत असे, म्हणून आम्हीच आपापल्या घरातील भांडी चोरली होती व राजूच्या दुकानात देऊन खाऊ घेतला होता.’’
सत्य समजल्यावर सगळ्या पालकांची मान लाजेने खाली गेली. त्यांनी जीवनला मारल्याबद्दल माफी मागितली. जीवनचे आईवडील अतिशय आनंदी झाले. आणि गावकऱ्यांनी पाटलांच्या राजूला पुन्हा असं न करण्याचा इशारा द्यायचं ठरवलं.
देवबाईने सगळ्यांकडे पाहून विचारलं, ‘‘पाहिलंत ना अखेरीस कोण चोर निघाले?’’
सर्व विद्यार्थी एकत्र म्हणाले, ‘‘देवदूत मॅडम, आजपासून आम्ही जीवनला चोर म्हणणार नाही. कृपया तुम्ही इथून जाऊ नका, आम्हाला खूप आनंद झाला आहे.’’
देवबाई समजावत म्हणाली, ‘‘विद्यार्थ्यांनो, मी खरोखर देवदूत नाही, तर आपल्या शाळेत नव्याने हजर व्हायला आलेली देवबाई आहे. जीवनला आनंद मिळावा म्हणून मी स्वतःला देवदूत म्हटलं, कारण त्याला वाटायचं देवदूतालाच खरं माहिती असतं. मला खोटं बोलल्याबद्दल माफ करा.’’
तेवढ्यात किशोर नावाचा एक पालक देवबाईकडे आला आणि हात जोडून म्हणाला, ‘‘तुम्ही जे केलं ते फार मोठं काम आहे. तुमच्यामुळेच आम्हाला सत्य कळलं. आता आम्ही जोपर्यंत स्वतः पाहत नाही तोवर कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही, .’’
सर्वांनी किशोरच्या विचाराला मान्यता दिली.
देवबाई म्हणाल्या, ‘‘आपली मुलं चांगली घडवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न करा; आम्ही शिक्षक आमच्या बाजूने साथ देऊ.’’
सगळ्यांनी 'हो' म्हटले आणि देवबाई व जीवनचे कौतुक करत घरी गेले. जीवन आनंदाने मित्रांसोबत वर्गात गेला. जीवनच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून देवबाई सुखावल्या.
अशा प्रकारे, देवबाईमुळे जीवनला नवे आयुष्य मिळाले.       
***

Comments

Popular posts from this blog

My Biodata Full

पर्जन्य मापक यंत्र नववी भूगोल *वृष्टी* पाठासाठी उपयुक्त सामग्री.