आत्महत्येचा विचार
🛑आणि मी स्वतःला संपवायचं ठरवलं! साधारण दिड ते दोन वर्ष झाली असतील या सगळ्याला. पहिल्या लॉक डाउनच्या एक महिना आधी मी एका मित्रावर विश्वास ठेवत नव्या नोकरीच्या आशेने सुरु असलेला जॉब सोडला. पहिल्यांदाच निर्णय चुकला. मी चुकलो. माणूस चुकला. तरी स्किल्स असल्याने आपण कुठेतरी चांगला जॉब मिळवूच ही खात्री होती. खरा घोळ सुरु झाला तो इथूनच. लॉक डाऊनमुळे अनेकांचे जॉब गेले होते. त्यामुळे अगोदरच खुप स्पर्धा असलेल्या आमच्या क्षेत्रात संधीचा तुटवडा पडू लागला. ज्या संधी होत्या तिथे हे जॉब गेलेले, अनुभवी कमी पगारात काम करायला तयार होते. स्पर्धा आणखी वाढली. मी चांगल्या संधीच्या शोधात होतो जी काही केल्या हाती लागतच नव्हती. शेवटी नाशिक सोडलं. घरी आई, बापांकडे जाण्याचं ठरवलं. अंगातला माज आणि खिशातला पैसा दोन्ही संपलेलं होत. एक चहा पिण्याचे देखील पैसे माझ्या हातात तेव्हा नव्हते. बापाकडून ते मागायचे नाहीत हे आधीच ठरवलेलं शेवटी तिकडेच जाऊन राहणं क्रमप्राप्त होतं. तिथला एक - एक दिवस स्वतःला दोष देत काढत होतो. माझी बहीण, आई, पप्पा म्हणायला तसे सोबत होतेच. पाठिंबा होता, त्यांना जमेल तसं ते मला समजून घेत होते, मला...