वातावरण निर्मिती
*वातावरण निर्मिती*
एखाद्या कामाची सुरुवात करण्यासाठी किंवा त्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी वातावरण निर्मितीची खूप गरज असते असं म्हटलं जातं; पण हे वातावरण म्हणजे काय हेच कळत नव्हतं.
आजही पूर्णपणे कळत नाही, परंतु जेवढं अनुभवलं तेवढं लिहिण्याचा हा प्रयत्न.
जून १९८८ मध्ये श्री भैरवनाथ शिक्षण संस्था, पोहाळे या संस्थेची स्थापना झाली आणि जून १९८९ पासून इयत्ता आठवीचा वर्ग तेथे सुरू झाला. भौतिक सोयी सुविधांची जुळणी करत करतच शाळा सुरू होती. एक एक वर्ष वाढू लागलं आणि वर्ग वाढू लागले तशी मनुष्यबळाची गरज भासू लागली. मनुष्यबळ उपलब्ध होत गेले. त्यावेळी या शिक्षण संस्थेचे बहुतेक संचालक शासकीय-निमशासकीय सेवेत होते, त्यामुळे शाळेसाठी खास असा वेळ देता येत नव्हता. या दृष्टिकोनातून एकदा संचालक मंडळाच्या बैठकीत विषय निघाला आणि प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत असणाऱ्या सहा संचालकांपैकी कुणीतरी शैक्षणिक अर्हता प्राप्त करून शाळेकडे यावे असे ठरले. त्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आवश्यक असणारी पुढील शैक्षणिक अर्हता म्हणजे बी.एड. प्रवेशासंबंधी चौकशा सुरू झाल्या. योगायोगाने त्यावेळी शिवाजी विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे पत्रद्वारा बी.एड. कोर्स सुरू झालेला होता, पैकी शिवाजी विद्यापीठात पदवीच्या गुणवत्तेवर प्रवेश दिला जात होता; मात्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या अभ्यासक्रमासाठी पदवीच्या गुणवत्तेबरोबरच प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षक म्हणून केलेल्या सेवेच्या कालावधीसही काही प्रमाणात प्राधान्य दिले जात होते. आम्ही दोन-तीन संचालकांनी दोन्ही विद्यापीठाकडे अर्ज केले.
योगायोगाने १९९२-९४ च्या बॅचला मला प्रवेश मिळाला. त्यावेळी कोल्हापूर येथील हरिहर विद्यालय या खाजगी प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत होतो. सन ९२-९४ अशा दोन वर्षांच्या बी.एड. अभ्यासक्रमासाठी अभ्यास केंद्र होतं आचार्य जावडेकर अध्यापक विद्यालय गारगोटी. हे प्रशिक्षण सेवांतर्गत असल्यामुळे तीन दीर्घ सुट्ट्यांमध्ये समंत्रय आणि चौथ्या सुट्टीत अंतिम परीक्षा असे वेळापत्रक होते. पहिल्याच समंत्रण सत्रानंतर विविध विषयांच्या प्रात्यक्षिक कार्यांची तपशीलवार माहिती देण्यात आली. त्यामध्ये एका विषयाच्या प्रात्यक्षिकाचा भाग म्हणून एका विषयासाठी नवसाक्षरास साक्षर करणे हे प्रात्यक्षिक कार्य होते. अर्थात त्या काळात नवसाक्षरता मोहीम चालूच होती, त्यामुळे नवसाक्षर मिळवणं अवघड नव्हतं; पण शहरातील नोकरीसाठीचा प्रवास आणि एकूणच वेळेचा विचार करता मी थोडा स्वार्थी झालो आणि नवसाक्षर बाहेर शोधण्यापेक्षा आपण आईलाच का शिकवू नये असा विचार मनात डोकावला. आईला विचारलं, 'आई तुला वाचायला-लिहायला शिकायची इच्छा आहे का?' आईने होकार दिला, तयारी दाखवली.
त्यानंतर केवळ दोन-तीन आठवड्यांत पूर्ण अक्षरांची ओळख (स्वर, व्यंजन यांची ओळख) अर्थात बाराखडीची माहिती आईने करून घेतली.
आजच्या अध्यापन पद्धती नुसार वाक्ये शिकवायला हवी होती, परंतु तिच्या वयाचा विचार करता वाक्य शिकवणं मला तेव्हा अयोग्य वाटलं, म्हणून अक्षरं, स्वर, व्यंजन, बाराखडी या पद्धतीने मी शिकवायला सुरुवात केली. आणि तिलाही ते योग्य वाटलं. एकदम वाचन करत असताना एकाचवेळी अनेक गोष्टी लक्षात ठेवणं तिला अवघड जात होतं, परंतु एका अक्षराची ओळख आणि त्याला दिलेल्या काना, मात्रा, वेलांटीची ओळख झाली की दुसऱ्या अक्षराला तशाच पद्धतीचा काना, मात्रा, वेलांटी लावून ती स्वतः वाचत होती. तीन आठवड्या नंतर मग लेखनाला सुरुवात केली मात्र लेखन कला अवगत व्हायला अधिक काळ लागला. याचं कारण म्हणजे हाताला नसलेलं वळण. आपल्या प्रात्यक्षिक कार्याची परिपूर्ती म्हणून मी स्वार्थी हेतूने जरी तिला वाचन-लेखन शिकवलं असलं तरीसुद्धा दीड दोन महिन्याच्या काळात ती स्वतःचे नाव स्वतः लिहू लागली. वर्तमानपत्रातल्या बातम्यांचे मथळे वाचू लागली. त्यांचा अर्थ समजून घेऊ लागली. दूरदर्शन वरील मालिकांची शीर्षके, उपशीर्षके वाचू लागली आणि हा प्रवास सातत्याने चालू राहिला.
वर्तमानपत्र घरात येतच होती. सकाळी वर्तमानपत्र आल्यावर वर्तमानपत्रावर पहिला हक्क आईचाच असायचा. त्यानंतर इतरांकडे जायची. आपण काय वाचतोय हे हळूहळू तिच्या लक्षात यायला लागला आणि मग आलेल्या शंका विचारून आई बातम्या समजून घेऊ लागली. वर्तमानपत्रात छायाचित्रं खूप महत्त्वाचं काम करतात. बातमीकडं वाचकांचं लक्ष आकर्षित करून घेण्याबरोबरच बातमीचा विषय पटकन स्पष्ट करण्याचे काम छायाचित्रांमुळे होते.
आणि कशाप्रकारे चित्रं वाचून, चित्रं बघून बातमी वाचनाकडे कल वाढायला लागला. काहीवेळा अनेक साहित्यिक, मित्र, शिक्षक यांच्या बातम्या छापून आल्या की आई फोटो दाखवून म्हणायची, 'हे आपल्या घरी आले होते.' मग ते कोण आहेत? त्यांचं नाव काय? आणि बातमी का आली आहे? हे सांगितल्यानंतर आईच समाधान व्हायचं.
लेखन विषय वातावरणनिर्मिती आहे परंतु या वातावरण निर्मितीकडे जाण्यासाठी म्हणून आवश्यक असणाऱ्या वातावरणाची निर्मिती आतापर्यंत झाली. आईचा आध्यात्मिक क्षेत्रातील प्रवास नाथपंथ, वारकरी पंथ, स्वाध्याय, भजन, कीर्तन असा होता होता आता प्रजापिता ब्रह्माकुमारी वर्गाजवळ येऊन थांबला आहे. थांबला आहे म्हणजे तिथं कार्यक्रम चालू आहेत. दररोजची बैठक, साप्ताहिक कार्यक्रम, अशामध्ये आई बराचसा वेळ घालवत असते आणि दररोज सकाळी नित्यनेमाने आपला वही-पेन घेऊन नामजप लेखन करत असते.
दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच प्रापंचिक घडामोडी झाल्या. मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली, त्यांना मुलं झाली आणि ती मुले आता शाळेत जाण्यात इतकी मोठी होऊ लागली. लहान मुलगा शेती, दुग्ध व्यवसाय सांभाळून कॉलेज पूर्ण करत आहे. तो कॉलेजवरून आला की अभ्यासाला बसतो. ते नातं म्हणजे मोठ्या मुलाची मुलगी पाहात असते. अनेकदा त्याला विचारत असते, 'काका तुम्ही काय करता?' काका म्हणतात, 'अभ्यास करतोय.' मी माझ्या खोलीत वाचन-लेखन करत असताना ती वरचेवर येते आणि म्हणते,'पप्पा, तुम्ही काय करता?' मग मी म्हणतो, 'अभ्यास करतोय.' जेव्हा जेव्हा सकाळी आई नामस्मरण नामलेखन करत असते. त्या त्या वेळी ती हमखास विचारायची, 'आई, तू काय करतेस?' मग आमचं ऐकून आई तिला म्हणायची, 'मी पण अभ्यास करते.'
एक दिवस चार वर्षाची चिमुरडी, 'मला पण वही-पेन पाहिजे, खडू-फळा पाहिजे, पाटी-पेन्सिल पाहिजे' असा हट्ट धरून बसली. मी सहज विचारलं, 'कशासाठी?' ती म्हणाली, 'काका अभ्यास करतात, तुम्ही अभ्यास करता, आई अभ्यास करते, मी पण अभ्यास करणार आहे.'
आणि या घटनेनंतर मला वातावरण निर्मिती करणे या वाक्प्रचाराचा थोडाफार अर्थ कळू लागला.
*©चंद्रकांत निकाडे.*
Comments
Post a Comment