मुलंच मुलं : संजय हळदीकर
*भावभावनांच्या आविष्कारात जाणिवांचा अंतर्भाव असलेले पुस्तक : मुलंच मुलं*
================
साहित्यातून भावनांचा आविष्कार होत असतोच पण त्यात जाणिवांचा अंतर्भाव जेव्हा होतो तेव्हा *मुलंच मुलं* सारखा वेगळ्या धाटणीच्या ग्रंथ साकारतो.
संजय हळदीकर हे नाव रंगभूमीशी अतूट बंधनांनी जोडलेलं आहे. कला क्षेत्रात नवनवे प्रयोग सातत्याने चालवणारा दिलखुलास अवलिया म्हणून ते ओळखले जातात. मुलंच मुलं या भाग्यश्री प्रकाशन कोल्हापूरने प्रकाशित केलेल्या त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून ते नऊ नवलकथा चित्रपटांचे कलादर्शन करताना मनावर ठसले पाच व्यक्तिमत्त्वांचा पंचामृत आणि अनुभव वर्ग त्याचा नकाशा सुगंधित फूलांचा गुच्छ याची वाचकांच्या शिदोरीत भर घालतात. मनाच्या अस्वस्थतेतून कागदावर उमलेली ही शब्दफुले आहेत.
'अंतःकरणाला जोडणारा कथांचा सेतू' अशा उद्धरणात पत्रकार अरुण खोरे यांनी या गद्य संग्रहाची भलावण केली आहे. ती नेमकी आणि अचूक वाटते.
पुस्तकातील आशय नेमकेपणाने स्पष्ट करणारे वेधक आणि बोलके असे मुखपृष्ठ साकारले आहे चित्रकार विजय टिपुगडे यांनी. तर आतील आकर्षक रेखाटनांनी पुस्तकाच्या सौंदर्यात भर घालण्याचं काम युवराज जाधव यांनी केला आहे.
'एक रंगकर्मी आणि एक प्रशिक्षक म्हणून वावरणारे संजय हळदीकर इथे या ग्रंथात साध्या, सोप्या, सरळ शब्दांत बालकांच्या मनात डोकावून आतलं विराट विश्व दाखवतात. त्याचे गंड, स्वप्ने, भय, गोंधळ आणि निरागसता आपल्याशी बोलते, आपल्याला हळवी करते आणि ते छळतेसुद्धा.' अशी या पुस्तकाची पाठराखण मलपृष्ठावर साहित्यिक आणि रंगकर्मी अभिराम भडकमकर यांनी केली आहे.
कमळीच्या चिकाचा खरवस ही पहिल्या अंकातील पहिली कथा. प्रकाश हा या कथेचा नायक. बापाच्या हट्टामुळे त्याचं नाव इंग्रजी शाळेत दाखल केले जाते. पण त्याचा मन शेत-शिवार आतच रमत असतं. प्रकाशला कमळी नावाच्या शेळीचा खूपच लागला होता. त्याचे कपडे, बोलणे, जेवणाचा डबा हा वर्ग मित्रांचा हेटाळणीचा विषय असायचा. शाळेत एकदा प्रकाशने पाककला स्पर्धेत सहभाग घेतला. सर्व शाळेत त्याचा प्रथम क्रमांक आलेला त्याचा मेनू होता लाडक्या कमळीच्या कोवळ्या दुधाचा खरवस.
फॅशन आणि फास्टफूडच्या जमान्यात नखरे करणार्यांना ज्युरींनी दिलेली ही सणसणीत चपराक होती.
स्वतः उपाशी राहून, अनवाणी पायांनी चालून मुलाचे कोड कौतुक करणाऱ्या बाबाबद्दलची कृतज्ञता चंद्या नावाच्या मुलाने बाला पत्र लिहून कळवली आहे. त्याचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, बापा प्रती असलेला आदर व्यक्त करणारी 'बाला पत्र' ही कथा.
आई आणि बाळ हे एक वैश्विक नातं आहे. मुलगा-मुलगी असा भेद कोणत्याच आईच्या मनात नसतो. आपल्या पुरुषप्रधान समाजात 'वंशाला दिवा पाहिजे' ही वेडपट समजूत जोपासले आहे. शेतकऱ्यालाही गोठ्यातील म्हशीला रेडी आणि स्वतःच्या पत्नीच्या पोटी मुलग्याने जन्म घ्यावा हा अट्टहास असतो. या कल्पनेला छेद देऊन नव्याने जन्मलेल्या बाळाकडे मानवतावादी दृष्टिकोनातून बघणारी आई आणि लेक यांची छोटेखानी पण मार्मिक कथा 'बाळ कसा आहे?' या नावाने मांडली आहे. एडस् या असाध्य रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या आई बापाच्या एकुलत्या मुलाचे मनोगत 'गोठ्यातल्या पोराचे स्वगत'मध्ये व्यक्त होते. एडस् अनुवंशिक नाही हे पूर्ण सत्य अधोरेखित करणारी ही कथा मुलांनी जिद्दीने प्रयत्न केले तर जागेपणी पाहिलेली करियरची स्वप्नं साकार होतात हेही सांगून जाते. आई बाबा वारल्यानंतर काका-काकींनी जनावरांच्या गोठ्यात ठेवलेला मुलगा शाळा शिकतो आणि इन्स्पेक्टर होतो. भेटीवेळी घाबरलेल्या काका-काकींना 'मी तुमचा पुतण्या' असा दिलासा तर देतोच पण मातृवात्सल गायीच्या पाठीवरून हात फिरवून कृतज्ञता व्यक्त करतो.
प्रसंगी उपाशी राहून आश्रमशाळेत शिकणाऱ्या फासेपारधी जमातीच्या मुलांनी प्रजासत्ताक दिनादिवशी मार्चिंग करून तथाकथित पुढारलेल्या व इंग्रजाळलेल्या सर्व ट्रुपमध्ये मेहनतीने प्रथम क्रमांक पटकावला यांची गौरव गाथा म्हणजे हंगर इज मार्चिंग ही कथा.
अपघातात आई-वडील गेलेल्या संतोषचा अजीने सांभाळ केला होता. आपल्या घरातील खोलीला एक खिडकी असावी असे त्याचे एक साधेच पण कलात्मक स्वप्न. 'माझ्या खोलीला खिडकी नाही' हा त्यांच्या कवितेचा शेवट वाचकांना अंतर्मुख करतो. मात्र त्याची आजी कल्पकतेने त्याचे स्वप्न पूर्ण करते आणि खिडकीतून आलेला चंद्रप्रकाशात संत्या समाधानाने तृप्त होऊन आनंद लहरीत जाऊन जातो असा सुखद शेवट असणारी खिडकी कथा.
निसर्गाच्या सानिध्यात पिला-पाखरांच्या सोबतीने ऊन, वारा, पाऊस यांच्या साक्षीने वृक्षवेलींच्या सहवासातील एका शाळेत रेवू नावाचा विद्यार्थी रममाण झाला आहे. आधुनिकतेच्या व्यावसायीक वृतीने ग्रासलेल्या व्यवस्थापनाकडून विकासाच्या नावाने ही शाळा पाडली जाते आणि झाडे, पक्षी, पिल्ले यांच्या विरहानं रेवू गहिवरून जातो. अशा काँक्रिटच्या जंगलात हरवलेले शाळेची कथा मराठी माध्यमातील शाळांची प्रतिनिधीत्व करणारी कथा वाटते.
वाहनांची प्रचंड गर्दी असणाऱ्या मेगा हायवेच्या पलीकडे राहणाऱ्या मामाला भेटण्यासाठी रस्ता ओलांडायला तासन तास वाट पाहावी लागणार्या बाळूचा प्रश्न मामा आल्यामुळे सुटतो. 'हायवे आपल्यासाठी नाही सुसाट धावणाऱ्या गाड्यांसाठी आहे. आपल्याला पल्ल्यावरूनच घरी जावं लागेल.' असे मामा त्याला सांगतो व तो त्याला घेऊन जातो मला पल्याड जायचं आहे या कथेत.
शहरातील झोपडपट्टीशेजारी असणाऱ्या अपार्टमेंटमधली मुलगी मिनूची कोरोना कडीबंदीच्या काळात शाळाही बंद असल्यामुळे झोपडीतील मुलांशी मैत्री जुळते; पण दोन-चार दिवसांनी त्या मुलांची भेट न झाल्यामुळे ती अस्वस्थ होते. चौकशी करताना आईकडून त्या झोपडीतील राहणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या लोकांची परिस्थिती तिला समजते. ती आईला विनंती करून दोन घरातील लोकांना एक वेळचे जेवण आणि थोडे पैसे द्यायला लावून माणुसकीचा झरा जिवंत ठेवते. लेखकाने असे कथानक 'हार्ड टाइम्स' या कथेत मांडून जगाचे वास्तव रूपच वाचकांसमोर उघड केले आहे.
पुस्तकाच्या दुसऱ्या भागात 'आम्ही असू लाडके' या चित्रपटासाठी कला दिग्दर्शन करत असताना लेखकांना भेटलेल्या निखिल, वन्या, गणेश, मनीषा आणि अभिजीत या बालकलाकारांच्या वास्तव जीवनातील मन सुन्न करणाऱ्या घटनांचा आलेख मांडलेला आहे. अंधश्रद्धा, अज्ञान, अवैज्ञानिक दृष्टिकोन, खोटी प्रतिष्ठा यामुळे पालकांकडूनच ज्यांची आयुष्ये उजाड होऊ पाहत आहेत अशा गतिमंद मुलांच्या व्यथा या भागात मांडलेल्या आहेत.
या चित्रपटात आलेल्या 'तन मनाच्या मंदिरी' या अर्थपूर्ण व भावगर्भ प्रार्थनेने स्वतःलाही अंतर्मुख व्हायला लावले असे लेखक म्हणतात. सर्व पालकांच्या नकारात्मकतेला सकारात्मक दृष्टिकोनात बदलायला लावण्यात या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अभिराम भडकमकर यशस्वी झाले आहेत. एका कलात्मक चित्रपटाच्या माध्यमातून आनंददायी नायकाचे स्वप्न साकारणल्याचा प्रत्यय ही संस्मरणे वाचताना नक्कीच येतो.
'मुलंच मुलं' या पुस्तकाचा तिसरा भाग अनुभवपर गद्याचा आहे. अजाणतेपणी अल्पवयात प्रेमात गुंतलेला मुलगा सुधारगृहात भेटल्यानंतर त्याची कैफियतत ऐकून, 'पौगंडावस्थेतील मुलांच्या मानसिकतेचा विचार करून समाजाने सकारात्मक विचार वाढीस लावली पाहिजेत' हा संदेश प्रेमजात या गद्यातून मिळतो.
खिडकी ही मध्यवर्ती कल्पना घेऊन मुलांमधील सृजनशक्तीचा अभ्यास करत असताना एका सुधारगृहात एक मुलगा आपली आई जिवंत असताना अधीक्षकांना आई मेली असे सांगतो. प्रत्यक्ष आई समोर आल्यावर 'आई मला सारखी बदडते; म्हणून मी तिला कायमचे मारून टाकले. मारणार्या आईपेक्षा मेलेली आई बरी' हे त्याचं अंतर्मुख करायला लावणारं तत्त्वज्ञान तक्रार मध्ये आला आहे.
विधायक संसद या संस्थेच्या निवासी आश्रम शाळेतील अभिनय कार्यशाळेत महाश्वेतादेवींच्या 'का? का? कुमारी' या केलेल्या नाट्यरूपांतरात भूमिका साकारणारी मुलगी पुढे शिक्षण घेऊन वकिलीचा व्यवसाय करू लागते तेव्हा पुन्हा ती लेखकास भेटते. शिक्षणामुळे जीवन परिवर्तनाचे एक आदर्श उदाहरण म्हणजे ही मोयना अर्थात पूजा आहे.
ज्या वातावरणात मुलांची वाढ आणि विकास होत असतो त्या परिसराचा प्रभाव त्यांचे वर्तन आणि विचारावर होत असतो. याचा प्रत्यय 'चित्रातली खिडकी' या गद्यात येतो. कामाठीपुऱ्यात एक मुलगी खिडकी विषयाचे चित्र रंगवताना बाहेर गिधाडे दाखवते. ती वखवखलेल्या माणसांच्या मनोवृत्तीची प्रतिके आहेत हे वेगळे सांगायला लागत नाहीत.
मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण चालू ठेवणारी आई आणि व्यसनी बाप यांच्या पोटी जन्मलेल्या विकासने कार्यशाळेत भीती या विषयावरील कविता लिहिताना फी नाही भरली तर परीक्षा बुडेल अशी चिंता व्यक्त केली. लेखक त्याची फी भरतात कालांतराने हाच इंजिनियर झालेला विकास भेटतो आणि आठवणीने गहिवरतो. हीच मलमपट्टी गद्याची मध्यवर्ती कल्पना. दूरदर्शनचा अतिरेक आणि विशेषतः कौटुंबिक कलहांच्या मालिकांत गुरफटून गेलेल्या गृहिणींबद्दलचे स्पष्ट वक्तव्य एका सहलीत मुलं करतात. 'आमच्या या हरवल्यात' या लेखात.
'हेमलकसा' हा असाच एक हृदयद्रावक अनुभव कथन केला आहे. ज्या मुलांसाठी आपण कला माध्यमातून काही थोडेफार काम करत आलो त्या त्यावेळी त्यांच्या विचारांनी व अनुभवांनी आपली पोतडी पुन्हा भरल्याची कृतज्ञता लेखक व्यक्त करतात.
Comments
Post a Comment