लामण दिवे-२ : सदानंद कदम
*लामणदिवे : दोन*
दीड वर्ष डफळापूरला काढून मी मिरज तालुक्यात बदलून आलेलो. तीस वर्षांपूर्वी. तेव्हाचे प्रभारी शिक्षणाधिकारी काही सामाजिक कामामुळं ओळखीचे झालेले. राज्य स्तरावरचं विज्ञान प्रदर्शन सांगलीत भरणार होतं. या प्रदर्शनाची प्रसिद्धी करणं आणि माध्यमांतून काही बातम्या देणं यासाठी त्यांना 'लिहिणारा' शिक्षक हवा होता. मी तेव्हा दैनिकांतून आणि आकाशवाणीसाठी लिहायचो. एवढ्या एकाच गोष्टीमुळं त्यांनी मला मिरज तालुक्यात बदलून घेतलेलं. एरवी घसघशीत वजनदार गठ्ठा हातावर पडल्याशिवाय कुणाच्याही बदली आदेशावर त्यांच्या लेखणीतून त्यांच्या नावाची अद्याक्षरंच उमटत नसत असं ऐकिवात होतं. ( तेव्हा बदली हा विषय जिल्हा स्तरावरून हाताळला जायचा. ) गड्याच्या हातावर वजन पडलं तर मात्र दिलेला शब्द ते खाली पडू द्यायचे नाहीत असंही कानावर यायचं. पण त्यांच्या कामाचा उरक दांडगा. माणूस मैत्रीलाही पक्का. पद विसरून मैत्री निभवायचा. माझं मैत्र जुळलं ते त्यामुळंच. दिसायलाही रुबाबदार. बुलेटशिवाय फिरायचा नाही. फौजदारच वाटायचा.
यथावकाश प्रदर्शन पार पडलं. आकाशवाणीच्या सुभाष तपासेसाहेबांनी तेव्हा स्वत: मैदानात उतरत राज्यभरातून आलेल्या मुलांच्या मुलाखती घेतलेल्या. मी मागे मदतीला. त्यांचं-माझं त्यावेळचं प्रकाशचित्र परवा इतक्या वर्षांनी हाती लागलं आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
प्रदर्शनाचं सूप वाजलं आणि मला शाळा मिळाली. पाटीलवस्ती बेडग. गावापासून चार किलोमीटरवर. रानात. पट अवघा चोवीस. बसमधून गावात उतरून मी पाणंदीतून चालत सुटायचो. मोकळ्या रानवाटेनं जाण्या-येण्यातला आनंद मिळायचा. वाचलेल्या कविता पाठ करत जाताना पायाखालचा सगळा रस्ता मखमली होऊन जायचा. विंदा, बोरकर, कुसुमाग्रज, पाडगावकर, महानोर सगळे माझ्या आजूबाजूला असायचे.
गावात दोन शाळा आणि एक हायस्कूल. मुला-मुलींसाठी स्वतंत्र शाळा. तिथल्या शिक्षकांची भेट व्हायची ती महिन्यातून एकदा होणाऱ्या केंद्र संमेलनातच. अशाच एका संमेलनात ते गुरूजी दिसले. दिसले म्हणजे त्यांनी लक्ष वेधून घेतलं माझं. जमलेली बहुतेक शिक्षक मंडळी आधुनिक पोषाखात होती. शर्ट-पायजमा घातलेले दोघं-तिघंच. त्यातलेच ते एक. लक्ष वेधून घ्यायचं कारण त्यांचं दिसणं. इस्त्री नसलेला धुवट शर्ट आणि विजार. थोडेसे ओठांबाहेर येऊ पाहणारे दात. चष्मा. डोईवरचा प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा. कंगवा असतो याची माहिती नसलेला. चेहरा थोडा लालसर आणि त्यावरची त्वचा नेमक्या शब्दांत वर्णन करता न येण्यासारखी. उकलल्यागत. बारीक बारीक तुकड्यांनी कात पडावी तशी. खरखरीत. सगळ्या घोळक्यात गडी उठून दिसत होता ते त्यामुळंच.
चारचौघात उठून दिसायला 'देखणं' असावं लागत नाही, तर 'वेगळं' असावं लागतं हे सहज दाखवून देणारं त्यांचं ते असणं.
शिक्षकांचे पाठ झाल्यानंतर प्रश्न विचारून समाधान करून घेण्यातही ते पुढं होते. त्यांचे प्रश्न समोरच्याला खिजवण्यासाठी नव्हे, तर स्वत:ला आकलन करून घेण्यासाठी होते हे सहज लक्षात येत होतं. पन्नाशीकडं झुकणाऱ्या त्या देहातली जिज्ञासा आणि कुतूहल जाणवत होतं. त्यांचं 'असणं' आता माझ्या मनात घर करू लागलं होतं.
गावापासून सहा किलोमीटरवरच्या एका द्विशिक्षकी शाळेवर ते कार्यरत होते. माझी ओळख झाली आणि मी त्यांच्या शाळेत जायचं ठरवलं. त्यांचं बोलणं प्रमाण भाषेतलं नव्हतं. ते ऐकताना एखादा शेतकरी मळ्यात काम करत करत गप्पा हाणतोय असं वाटायचं. जुन्या काळात सातवी आणि ट्रेन्ड झालेला हा शिक्षक नेमकं शिकवतो तरी कसा हे मला जवळून बघायचं होतं. जाणून घ्यायचं होतं. काहीशी उत्सुकता, बराचसा अविश्वास.
त्यांची वेळ घेऊन मी एका सकाळी त्यांच्या घरी गेलो. घरी चार छोट्या मुली. पत्नी गेल्यानंतर त्यांनीच वाढवलेल्या.
मी गेलो तेव्हा ते मुलींचं आवरत होते. खाणं-पिणं, वेणी-फणी... सगळंच. त्यांना शाळेला जायला सांगून डबा आणि सायकल घेऊन गुरूजी बाहेर पडले. जवळच्या दुकानातून त्यांनी मलाही सायकल भाड्यानं घेऊन दिली. गावाबाहेरच्या रस्त्यावर आलो, तर तिथं पहिली-दुसरीतली दोन-चार मुलं हात करत असलेली. सोबत त्यांच्या आया.
गुरूजी थांबले. त्यांनी दोन मुलं पुढं नळीवर, दोन मुलं मागं कॅरेजवर घेतली. त्यांच्या पिशव्या हॅण्डलला अडकवल्या आणि ते चालत निघाले. मलाही पायपीट करावी लागली. गावात मुला-मुलींची पहिलीपासूनची स्वतंत्र शाळा असताना या लहानलहान लेकरांना त्यांच्या पालकांनी सहा किलोमीटरवरच्या शाळेत का घातलं असावं हा किडा माझ्या डोक्यात वळवळत होता.
डोक्यात हजार प्रश्न. मुलांना या गुरूजींच्याच शाळेत घालावं असं पालकांना का वाटावं ? तेही ढुंगणाशेजारी दोन-दोन शाळा असताना ? बरं गुरूजींचं रूपडं बघावं तर पालकांनी भाळावं अशा कुठल्याही खुणा त्यावर दिसत नव्हत्या.
किडा जास्तच वळवळत होता.
या गुरूजींमध्ये काहीतरी वेगळं होतं... असावं. पण ते नेमकं काय हे माझ्या ध्यानी येत नव्हतं.
शाळेत जाईपर्यंत माझा घामटा निघाला. वाटेत दोन-दोन चढ. मी एकटा, तरी आतून भिजलो होतो. घामाची धार नको तिथंवर पोहोचलेली जाणवत होती. गुरूजींच्या सायकलवर चार लेकरं होती.
शाळा माळावर रस्त्याच्या आत, डाव्या हाताला. दोनच खोल्या. साधारण दहा गुंठ्याचं क्षेत्र. त्याच्या चारही बाजूंवर झाडं लावलेली दिसत होती. जवळपास पाणी दिसत नव्हतं.
'गुरूजी, ही झाडं कधी लावली ? कुणी लावली ? आणि याला पाणी कोण घालतं, कुठून आणता ?'
'अहो, लेकरांना सावली हवी म्हणून मीच लावली परवा. इथं वस्तीवर गडी कुठून मिळणार ? मग मीच एका रविवारी दिवसभर शाळेत थांबून खड्डं काढलं आणि लावून टाकली झाडं. आता ही झाडं मोठी होतील तेव्हा माझी शाळा शांतिनिकेतनसारखी दिसेल. बघाच तुम्ही.'
'आणि पाण्याची सोय ?'
'त्या पलीकडच्या अंगाला एक विहीर आहे. उन्हाळ्यात आटते, पण एरव्ही पाणी बक्कळ. तिथनं कावडीनं पाणी आणून जगवतोय ही झाडं.'
त्यांनी दाखवलेल्या दिशेला लांबवर एक वस्ती दिसत होती. ते अंतर पाहून माझी छातीच दडपली. मी गुरूजींच्या तोंडाकडं बघतच राहिलो. शब्दही फुटत नव्हता.
वर्गात गेलो. सगळ्या भिंती चित्रांनी आणि शब्दांनी नटलेल्या. गुरूजींनी रंगीत खडूंनी काढलेली चित्रं त्यांच्या हातातलं कौशल्य सांगत होती.
त्यांचं हसत-नाचत सुरू झालेलं शिकवणंही अनुभवलं. पन्नास-साठ मुलं होती. सगळी कष्टकऱ्यांची. वस्तीवरची. दिवसभर त्यांच्यात थांबलो.
दुपारी सगळ्यांसह गुरूजींना मैदानात मांडी घालून गोलाकार बसून जेवताना पाहिलं. त्याच मैदानातल्या मातीत धुळपाटीवर शिकवताना आणि मैदानात उतरून मुलांत मिसळून खेळतानाही पाहिलं.
आयुष्यात पहिल्यांदाच मी त्या मुलांच्या वयाचा नसल्याची कळ उरात चमकून गेली.
दुपारी जेवणानंतर मुलं आणि गुरूजी वर्गात. मी बाहेर पटांगणावर. सगळीकडं फेरी मारली. अगदी कानाकोपऱ्यातही. खरकटं सोडाच कागदाचा एक कपटाही नजरेला पडला नाही. जाणीवपूर्वक शोधूनही. गंमत म्हणजे 'खरकटं गोळा करा, झाडलोट करा' अशा कुठल्याही सूचना देताना गुरूजींना मी ऐकलं नव्हतं. दिवसभरात एकदाही.
संध्याकाळी गुरूजींनी मुलं मैदानावर घेतली. गोलाकार उभी केली. गोलात उतरून त्यांनी आपल्या चेहऱ्यावर एक मुखवटा चढवला. पुढचा तासभर मी त्यांचा तो एकपात्री प्रयोग पाहत होतो. खुळावल्या डोळ्यांनी. मंत्रमुग्ध होत. गुरूजींच्या जागी मी कधीच न पाहिलेले गिजुभाई बधेका मला दिसत होते.
खेळ संपला. शाळा सुटली आणि ती चार लेकरं सायकलवर घेऊन आम्ही गावाकडची वाट धरली.
माझे प्रश्न सुरू झाले.
'गुरूजी, आत्ता जे तुम्ही केलंत ते कुठं शिकलात ? कसं जमतं तुम्हाला ?'
'अहो, मला नाटकाची आवड. आमच्या गावच्या जत्रेत नाटकं सादर करतो मी. त्राटिकेची सोंगं निघतात. माझाच पुढाकार असतो त्यात. शाळेत तोच उद्योग करत मी त्यातून पाठ्यक्रम शिकवतो. मीच संवाद ठरवतो. सुचेल तसं बोलतो. मुलांना ते समजतं. त्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं सूर्यफूल मला माझ्या व्यथा विसरायला शिकवतं. खूप आनंद मिळतो यात.
रोज माझं आयुष्य वाढतं.'
गुरूजी हे सगळं करत होते, तेव्हा 'रचनावाद' हा शब्दही कानावर पडत नव्हता. त्याचा प्रपोगंडा करून कुणी गुरूजी मंडळींना भय दाखवत नव्हतं की 'वाद' शिकण्यासाठी माझीच पुस्तकं घ्या म्हणून दुकानदारीही करत नव्हतं.
मुलांविषयी आतून तळमळ असणारे, त्यांना समजेपर्यंत शिकवणारे असे अनेक गुरूजी तेव्हा गावागावांत होते. आजही आहेत. प्रवाहात सामील न होता, त्याविरुद्ध पोहत आपल्या कामाचा झेंडा डौलानं फडकवत आहेत.
काम करत असल्याचा आव आणणाऱ्या, मिरवणाऱ्या गर्दीपासून अशी माणसं तेव्हाही दूर होती आणि आताही लांबच आहेत.
शिखरं पठारापासून लांबच असतात. एकेकटी. पण सदैव ताठ असतात. न झुकता.
गुरूजीही तसेच, त्यातलेच.
गुरूजी त्यांच्या त्राटिकेच्या सोंगाबद्दल सांगत होते.
'सोंग घेणं' म्हणजे रूप धारण करणं, मुखवटा धारण करणं. पण गुरूजी केवळ 'सोंग घेत' नव्हते, तर त्यांनी घेतलेलं सोंग त्यांना 'चढत होतं' याचा अनुभव मी दिवसभर घेत होतो.
काळजातली दु:खं विसरून, निरनिराळ्या सोंगात भान हरपून दंग झालेलं पाहिलं होतं मी त्यांना. दिवसभर.
चंद्रभागेच्या वाळवंटात टाळ घेऊन नाचणाऱ्या वारकऱ्यांत आणि या गुरूजीत काहीच निराळं दिसलं नव्हतं मला. तीच तळमळ, तोच ध्यास आणि तीच एकात्मता. जणू त्या लेकरांतल्या पांडुरंगाची पूजा गुरूजी रोजच बांधत होते.
गावात दोन-दोन शाळा असतानाही आपली पहिली-दुसरीतली मुलं या सहा किलोमीटरवरच्या शाळेत, गुरूजींच्या सायकलवरून पालक का पाठवत होते, याचं उत्तर मला मिळालं होतं.
त्या मुलांसह सायकल चालवत गावाकडं परतणाऱ्या गुरूजींकडं पाहताना मला तुकोबा आठवत होते.
'बहुरूपी रूपें नटला नारायण |
सोंग संपादून जैसा तैसा |'
गुरूजींचा भाऊ तेव्हा पोलीस अधीक्षक होता. दुसऱ्या जिल्ह्यात. गुरूजींची बायको गेल्यावर त्यानं यांना नोकरी सोडून चार मुलींसह आपल्याकडं येण्याचा हट्ट धरलेला.
'आपला श्वास शाळेतल्या लेकरांत अडकला आहे' असं सांगत गुरूजी गावातच थांबले होते. स्वप्नातलं शांतिनिकेतन प्रत्यक्षात आणण्याची धडपड करत होते.
शाळेसमोरच्या रस्त्यापलीकडची शेती मिरजेतल्या एका प्रख्यात डॉक्टरांची होती. त्यांनी एकदा सुटी दिवशी यांना शाळेत पाहिलं. कावडीनं पाणी आणून झाडांना घालताना.
काही न बोलता डॉक्टर मिरजेला परतले. दुसऱ्या दिवशी त्यांची माणसं शाळेत आली. कूपनलिका काढून त्यावर मोटर बसवून गेली.
आज गुरूजी नाहीत. पण त्यांच्या स्वप्नातलं ते शांतिनिकेतन बहरलंय. गच्च झाडीतली ती शाळा... तिची इमारत आता रस्त्यावरून दिसतही नाही. शाळेचा पटच नाही, तर लौकिकही वाढलाय. स्पर्धा परीक्षांपासून सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत वाजणाऱ्या तिच्या नौबती कानावर पडतात तेव्हा गुरूजींची हमखास आठवण येते.
भाबडं रूप, काळजातली तळमळ आणि कामावर निष्ठा एवढ्या बळावर झटणाऱ्या बेडगमधल्या सानपवस्ती शाळेच्या या गुरूजींना त्यांच्या स्वप्नातली शाळा आपल्या हयातीत पाहता आली. आता ती शाळा 'जंबूअण्णांची शाळा' म्हणूनच आमच्या मनात कायमची वसलेली. त्या शाळेचं नाव निघालं की आठवतात जंबू सत्याप्पा कुंभार गुरूजी.
चांगलं काम करण्यासाठी 'देखणं' दिसण्याची नव्हे तर 'वेगळी' नजर असण्याची गरज असते हे सांगणारे. आपल्या कामातून ते दाखवून देणारे. सतत नवी स्वप्नं पाहणारे.
आता 'असण्या'वर नाही, तर 'दिसण्या'वर साऱ्यांचं लक्ष. मग ती शाळा असो नाहीतर वर्गखोल्या. सगळं कसं चकचकीत आणि स्मार्ट हवं. तसं ते हवंही. शंकाच नाही. पण 'देखावा' करण्याच्या नादात शिक्षण मात्र हरवत चाललंय.
गुरूजनांना मातृभाषाही नीट लिहिता न येणं हे कशाचं लक्षण आहे ?
लिहिताना चुकणं एकवेळ मान्य, पण शिकण्याची इच्छाच नसणं हे घातक.
©सदानंद कदम. ९४२०७९१६८०
Comments
Post a Comment