आत्महत्येचा विचार
🛑आणि मी स्वतःला संपवायचं ठरवलं!
साधारण दिड ते दोन वर्ष झाली असतील या सगळ्याला. पहिल्या लॉक डाउनच्या एक महिना आधी मी एका मित्रावर विश्वास ठेवत नव्या नोकरीच्या आशेने सुरु असलेला जॉब सोडला. पहिल्यांदाच निर्णय चुकला. मी चुकलो. माणूस चुकला. तरी स्किल्स असल्याने आपण कुठेतरी चांगला जॉब मिळवूच ही खात्री होती. खरा घोळ सुरु झाला तो इथूनच. लॉक डाऊनमुळे अनेकांचे जॉब गेले होते. त्यामुळे अगोदरच खुप स्पर्धा असलेल्या आमच्या क्षेत्रात संधीचा तुटवडा पडू लागला. ज्या संधी होत्या तिथे हे जॉब गेलेले, अनुभवी कमी पगारात काम करायला तयार होते. स्पर्धा आणखी वाढली. मी चांगल्या संधीच्या शोधात होतो जी काही केल्या हाती लागतच नव्हती. शेवटी नाशिक सोडलं. घरी आई, बापांकडे जाण्याचं ठरवलं. अंगातला माज आणि खिशातला पैसा दोन्ही संपलेलं होत. एक चहा पिण्याचे देखील पैसे माझ्या हातात तेव्हा नव्हते. बापाकडून ते मागायचे नाहीत हे आधीच ठरवलेलं शेवटी तिकडेच जाऊन राहणं क्रमप्राप्त होतं. तिथला एक - एक दिवस स्वतःला दोष देत काढत होतो. माझी बहीण, आई, पप्पा म्हणायला तसे सोबत होतेच. पाठिंबा होता, त्यांना जमेल तसं ते मला समजून घेत होते, मला पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्न करत होते. पण मी, मी खचत चाललो होतो. लहानपणापासून लहानसं स्वप्नं होतं 'बाप कारखान्यात १२ तास काम करतो, तसं काम करायचं नाही' त्यासाठीच शिक्षण सोडल्या नंतरही पुन्हा शिकलो. माझं हे स्वप्न पूर्ण केलं. जगलो. आणि चुकलो. जे करायचं नाही असं ठरवून माझ्या संघर्षाची सुरुवात झाली शेवटी तेच करणं माझ्या नशिबी आलं होतं. माझी अस्वस्थता वाढत गेली. हसत - खेळत जगणारा, भिडस्त स्वभावाचा मी, शून्यात हरवायला लागलो. तरी अशाही काळात एका मैत्रणीचा आधार होता. काळाने तो ही हिरावून घेतला. करिअर मध्ये अचानक लागलेला ब्रेक, गैरसमजामुळे दुरावलेला मित्र, बेरोजगारी आणि परिवाराच्या अपेक्षा. त्यातून आलेली खिन्नता आणि एकाकीपण. अशाकाळातच सर्वात जवळची भासतं असलेल्या व्यक्तीचं अचानक बदलणं, आयुष्यातून निघून जाणं ही सारी माझ्या इमोशनल ब्रेकडाऊनची कारणे. त्यानंतर हळू - हळू, एक- एक पाऊल टाकत नैराश्य मला घट्ट कवटाळू लागलं.
या अगोदर माझ्या आयुष्यात अडचणी नव्हत्या का? तर त्या होत्या. मी या पूर्वी कधीही एकटा पडलो नव्हतो का? तर तस ही नाही. तेव्हा नैराश्य येतं नव्हतं का? तर तेही येतं होतच.पण, ते झटकून ही टाकता येतं होतं. एकातांत वेळ घालवणं, एकट्यानेच फिरणं वगैरे आवडतं होतं. तेच माझ्यासाठी माझं मेडीटेशन. काही झालं की गोदेच्या काठावर जावून बसणं, जे वाईट घडून गेलंय, चुकतंय किंवा चुकलयं असं वाटतंय त्यावर शांततेत विचार करुन मग निर्णय घेणं. जवळच्या लोकांशी बोलणं. ही माझी कोपअप सिस्टम माझ्याही नकळत तयार झाली होती. त्यामुळे तेव्हा नैराश्याने ग्रासलो नाही किंवा फारसा त्रास ही झाला नाही. मी स्वतःला प्रचंड आशावादी समजत होतो. मी सकारात्मक विचार करतो, लोकं मला पाहून प्रेरित होतात ही आत्मप्रौढी मी मेंटली, इमोशनली खुप strong असल्याचा माझा समज दृढ करत गेली. भावनिक असणं म्हणजे कमजोर, कमकुवत असणं हा गैरसमज माझ्या मनात घर करू लागला. आत्मविश्वास खालावत गेला. आत्महत्येची स्वप्न आणि विचार येऊ लागले. आम्ही राहतो तिथे घरासमोर रस्ता आहे. वाहनांनी नेहमी गजबजलेला असतो, तिथून जाणारी प्रत्येक ट्रक दिसली की मला त्यासमोर उडी मारावी असं वाटू लागलं. घराजवळचं रेल्वे स्टेशन आहे, तिथल्या तारांना लटकावं वाटू लागलं. ट्रेन समोर आडवं व्हावं आणि हे सगळं संपावं वाटू लागलं. एव्हाना मला नैराश्याने अशी घट्ट मिठी मारली की मेंदू मंदावला. मी डिप्रेशन मध्ये गेलो.
त्या काळात इतका हळवा आणि संवेदनशील बनलो की खुप छोट्या छोट्या गोष्टींनी दुखावू लागलो. घरातल्या, बाहेरच्या वेगवेगळ्या कामात स्वतःला गुंतवू ठेवू लागलो. सायकल काढून ३० ते ४० किलोमीटर पर्यंतची चक्कर धुंदीत मारू लागलो. छोटी - छोटी काम मला करता येत नव्हती, काहीही करतांना लक्ष लागत नव्हतं, सारखं एकच विचार, तेच ते दुःख. मीच का? हे माझ्या सोबतच का घडतंय? मला इतरांसाठी तर सोडा स्वतःसाठी ही काहीच का करता येत नाहिये? असे प्रश्न अस्वस्थ करत होते. जेवण कमी झाल होत. भूक उडाली होती. घाशा खालून अन्नच गिळता येईनास झालेलं. त्यामुळे तब्बल १२ किलो ७०० ग्रॅम वजन कमी झालं. शरीर खालावत गेलं कारणं मेंदू स्वस्थ नव्हता. नंतर अतिविचारामुळे झोप उडाली. तीन चार दिवस झोपू शकलो नाही. Panic attack येऊ लागले. सुदैवाने मला जगण्याची आशा आणि मरणाची भिती दोन्ही होते. टीम हितगुज या अक्षय ठाकरेच्या मेंटल हेल्थ वरील प्रकल्पाविषयी माहीत होत. मित्र करत असलेलं चांगलं काम म्हणून मी याकडे पाहत होतो. मला मदतीची गरज आहे असं वाटू लागलं. अक्षयला थोडक्यात तसं सांगितलं. त्याने टीम सोबत चर्चा केली. मला पहिली appointment मिळाली. काउन्सलींग सुरु झाली पण मला हितगुज पासून मिळत असलेलं समुपदेशन उपयोगात आणता येत नव्हतं. निर्णय चुकत होते, बेरोजगारी अस्वस्थ करतं होती आणि जवळच्या व्यक्तीचं जाणं, बदलणं मी कदाचीत मान्यच करु शकतं नव्हतो. हे दुःख, अपराधीपण, स्वतःला दोष देणं इतकं आवाक्या बाहेर गेलं की आणि शेवटी मी स्वतःला संपवायचं ठरवलं. याची परिणीती एका मध्यरात्री मी आत्महत्येचा प्रयत्न करण्यातून झाली. त्या नेमक्या क्षणाला फक्तं तेव्हा होत असलेल्या त्रासातून मुक्त होणं गरजेचं वाटतं होत. त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग दिसत होता तो म्हणजे स्वतःला संपवणं. (आता ही हे लिहताना डोळे भरून आलेत, काटे आलेत अंगावर, हात थरथरतायेत. ते सगळं नव्याने डोळ्यापुढे पुर्ण गेलय.) मी त्यातून बचावलो. शांत झालो. पण स्वतःच्याच नजरेत पडलो. उभं राहणं गरजेचं होतं. आई अशिक्षित, बाप १० वी पास दोघांना नेमकं काय घडतयं हे कळत नव्हतं. बहिणीला अशी परिस्थिती कशी हँडल करतात माहित नव्हतं. तोवर तिच्यासाठी मीच तिचा हिरो होतो. जो आता पूर्णपणे खचला होता. शून्य झाला होता. तिचही वैयक्तिक आयुष्य आनंदी नव्हतच. एकूणच केवळ मीच नाही तर माझी सपोर्ट सिस्टम देखील डळमळली होती. माझ्या या स्थितीला कुणी एक व्यक्ती किंवा एक घटना कारणीभूत नव्हती. मला सावरायच्या प्रयत्नात बाप वेगवेगळे कामाचे पर्याय शोधत होता. वय वाढत चाललेल्या पोराला सेटल करावं ही त्यांची धडपड. आई मायेने गोंजारत होती. पण तिची अति चिंता आणि अधून - मधून येणारे प्रश्न मला आणखी अपराधीपण आणत होते. माझी किंमत माझ्याच नजरेत शून्य झाली होती. आत्मविश्वासाचा पार चक्काचूर झाला होता. पण आत कुठेतरी यातून निघावं, पुन्हा उभं राहावं वाटतं होतं. समुपदेशनातून स्वतःचा इतिहास समोर आला तर तो असाच संघर्षाने भरलेला असल्याचा अनुभव पहिल्यांदा झाला. मी उभारी घ्यायला तयार होतो. पुढे स्वतःला दोषी समजणं समुपदेशनातून हळु - हळू कमी होत गेलं. डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधं सुरु होती. मग डायरी लिहायला घेतली. मनातली सर्व घुसमट त्यात निघू लागली, मी रिता होऊ लागलो. व्यायाम सुरू केला. मेडिटेशन ट्राय केलं. (ज्याचा मला काही उपयोग झाला नाही) अनिकेत गुळवणीच लिखाण वाचत होतोच ते आता कळू लागलं होत कारण रीलेट करता येत होत. त्यामुळे बरीच मदत झाली. हळू - हळू विचारात स्पष्टता येत गेली. समुपदेशनातून शिकलो माझ्याकडे जॉब, मित्र, नाती काहीही नसलं तरी मला किंमत आहे. कारणं मी आहे. गालिब म्हणतो तस "न था कुछ तो ख़ुदा था, कुछ न होता तो ख़ुदा होता, डुबोया मुझको होने ने न होता मैं तो क्या होता"
आज रोजी मी गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यात यशस्वी झालोय. मनासारखा चांगला जॉब आहे. काम पूर्वीपेक्षा अधिक चांगलं झालय, होतय. तरी, प्रॉब्लेम अजून ही आहेतच. पण आता पुर्वी सारखा खिन्न, हताश नाही. काहीतरी बिनसलंय हे कळतं. ते सुधारता येऊ शकतं हे कळतं. आता उमेद आहे जगायला. कारणं "आपल्याला त्रास होतो म्हणून आपण मरण्याचा निर्णय घेतो. हे सर्व संपेल असा आपला समज. वास्तवात आपण मागे उरणाऱ्या लोकांना Pain pass on करतो." हे पटलय.
इतकचं सांगतो "तुम्ही ज्या ही मानसिक, आर्थिक, भावनिक परिस्थितीत आता आहात ती तशीच राहणार नाहीये. ती बदलली म्हणून खचू किंवा हुरळून जावू नका. आपण माणसं आहोत, जरा स्वतःशीच माणसासारखं वागूया. जगूया, जगू देऊया. एकमेकांचं मानसिक आरोग्य जपत राहूया!"
Love you All 😘
;
ताक : हे शेअर करावं वाटलं कारण याच फेसबुकवर डिप्रेशनचं नाटक करून Sympathy मिळवणारी एक जमात अलीकडेच अस्तित्वात आलीय. त्यांच्या सारख्यांमुळे मानसिक आजाराकडे बघण्याचा माणसाचा दृष्टिकोन बदलू नये असं वाटतं.
- भरत निकम
(सोबतचा फोटो त्याच काळातील आहे)
टिप: तुम्हाला वाटलं तर कॉपी पेस्ट करून शेअर करु शकता. अथवा माझ्या प्रोफाईलवर शेअरच ऑप्शन आहे.
Comments
Post a Comment